कुलदैवत श्री खंडोबा महाराज, कोंढापुरी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सीमा, घोडनदीमुळे विभागलेला प्रांत, शेजारीच अहमदनगरच्या निजामशाहीचा अंमल असलेला हा भाग. स्वराज्याचे पंतप्रतिनीधी पेशवे आणि इंग्रज यांची लढाई झाल्यानंतर इंग्रजांच्या अंमलाखाली आलेला हा भाग. आजच्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शेवटचा शिरुर तालुका.तालुक्यामध्ये रामलिंग आणि अष्टविनायक रांजणगाव गणपती देवस्थानचा पवित्र हिंदू वारसा लाभलेला हा भाग. तालुक्यातून जाणाऱ्या वेळ नदी व तालुक्याच्या सीमा आखणाऱ्या भीमा आणि घोड नदीचा हा भाग.
याच शिरूर तालुक्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात असणारे कोंढापुरी हे एक गाव… गावात आजही अस्तित्वात असणाऱ्या गायकवाड सरकार घराण्याच्या शौर्याची, ऐश्वर्याची साक्ष देणाऱ्या पाऊलखुणा… गावची वेस, गावकुसाची भिंत, विविध वाड्यांचे भव्य प्रवेशद्वार, गावातील देव देवतांची मंदिरे, शिवकालीन बारवा व आड. यापैकी एका बारवेतील शिवकालीन शिलालेख व या बारवेसाठी गावकुसातून उघडला जाणारा पाणी दरवाजा हे नाव आजही अस्तित्वात आहे.
गावाचे नाव मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असुन गावचे मूळ पुरुष सरदार कोंडाजीराव गायकवाड (सरकार) यांच्या नावाने ओळखले जाते. याबाबतचा इतिहास पुढीलप्रमाणे… शिवनेरी चाकण परगण्यातील दावडी निमगाव हे गाव. त्यावेळचे यादव आडनाव असलेले आणि आजचे गायकवाड (सरकार) कुटुंब कबिल्याचे मुळ निवासस्थान, दावडी येथील निजामशाहीच्या कर्तव्यात असणारे सिद्धराजे यादव यांचे सुपुत्र विजयराव, विश्वासराव आणि कन्या दुर्गाबाई. आजही दावडी येथील भव्य-दिव्य भुईकोट किल्ला व श्री खंडेरायाचे मंदिर गायकवाड सरकार घराण्याच्या अस्तित्वाची, ऐश्वर्याची व शौर्याची साक्ष देत दिमाखात आपले अस्तित्व टिकून उभा आहे.
विश्वासराव यादव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार. त्यांची बहीण दुर्गाबाई ही शहाजीराजे भोसले यांचे धाकटे बंधू शरीफजी राजे यांची पत्नी. या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्याने, आदिलशाहीतील धामधुमीच्या काळात व भोसले जाधव वैमनस्यातील दिवसांमध्ये शहाजीराजांनी आपले मेहुणे विजयराव व विश्वासराव यांच्याकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि विश्वासाने प्रसुतीसाठी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या यादव (गायकवाड) कुटुंबात झाला. सौ. लक्ष्मीबाई विजयराव यादव आणि सौ. सावित्रीबाई विश्वासराव यादव यांनी प्रसूती काळात जिजाऊ मासाहेबांची काळजी घेतली, वयाच्या दीड वर्षापर्यंत बाल शिवाजी राजे यादव कुटुंबात राहिले.
पुढे १६५० साली गोरक्षणाच्या प्रसंगातून यादव यांचे आडनाव गायकवाड असे रुढ झाले. या प्रसंगामध्ये विजयरावांना वाघाच्या तावडीतून गाईचे प्राण वाचवून तिला वाड्यातील कवाडाच्या मागे ठेवून नन्त बाघाने केलेल्या हल्ल्यात वीरगती प्राप्त झाली. सर्व बंधूंनी या च्या व विजयरावांच्या शौर्याची आठवण म्हणून गाय आडनाव केले. विजयराव हे गायकवाड आडनावाचे जनक आहेत. म्हणजे यि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म गायकवाड कुटुबात झाला.
शरीफजी राजे भोसले (शहाजीराजांचे धाकटे बंधू) हे गायकवाड घराण्याचे पहिले जावई. छत्रपती शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजीराजे (कनकगिरी युद्धवीर) हे दूसरे जावई. (विजयराव यादव यांची कन्या जयंतीबाई उर्फ मकोऊबाई यांचे पती) छत्रपती शिवाजीराजे हे तिसरे जावई (विश्वासराव यादव यांची कन्या सकवारबाई).
सरदारकी गाजवत असताना वाढत जाणारी जहागिरी, परगण्यातील कारभाराच्या जबाबदारीनुसार कुटुंबातील इतर सदस्यांनी ठिकठिकाणी नवीन वसाहती वसविल्या. विजयरावांची मुले नंदाजीराव, तिमाजीराव, भिवाजीराव वकोंडाजीराव हे अनुक्रमे आजचे बडोदा, चांदखेड, मुंढवा आणि कोंढापुरी या ठिकाणी विस्थापित झाले.
सरदार कोंडाजीरावांनी घोडनदीच्या परगण्यातील कामिनी ओढ्याकाठी भौगोलिक परिस्थिती पाहून बाळापूरी नावाचे गाव वसवले.दळणवळणाच्या रस्त्यालगत असल्यामुळे एका आक्रमणात बाळापूरी विखुरली गेली. सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करुन, पुन्हा थोड्या अंतरावर नवीन सोनापूरी नावाने वसाहत वसवली. त्या काळातील साथीच्या रोगाने व त्यानंतरच्या जीवघेण्या भूत व जादुटोण्यांच्या प्रयोगांमुळे परत एकदा ही वस्ती मोडावी लागली. शेवटी स्थैर्य, आरोग्य, धन-धान्य, पुत्र-पैत्र लाभ आणि शांती आदी विधी करून गायकवाड कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या नावाने डोंगर माथ्यावर कोंडापुरी वसली. वस्ती स्थिरस्थावर झाल्यावर गावाला सुरक्षितेच्या दृष्टीने बुरुंज असलेले गावकुस बांधण्यात आले. प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार व वेस बांधण्यात आली. कुटुंबांसाठी वाडे बांधण्यात आले. भव्य दिव्य अशा काळ्या पाषाणाची मंदिरे बांधण्यात आली. कोंडाजी गायकवाड आणि परिवार यानंतर स्थिरस्थावर होऊन कोंडापुरी या ठिकाणी आनंदाने नांदू लागले.
बदलता काळ, बदलती राजकीय समीकरणे व परिस्थितीनुसार शिवशाहीनंतर इंग्रजी राज्याचा अंमल सुरू झाला. कोंडापुरी या गावच्या नावाचा पुढे अपभ्रंश होऊन कोंढापुरी हे गावाचे नाव प्रचलित झाले.
इंग्रज राजवटीत सिमेंटचा पुणे-नगर-औरंगाबाद हा हमरस्ता तयार केलेला होता. जो शिरुर तालुक्यातून आणि कोंढापुरी गावातून जात होता. दोन्ही बाजूच्या वड, पिंपळ, चिंच व इतर देशी झाडांनी हा पूर्ण आच्छादलेला असायचा. याच रस्त्यावरुन मुख्य वाहतूक होत असे. पुण्याहून निघालेला इंग्रज अधिकारी व लवाजमा प्रवासाचा सर्वात मोठा व पहिल्या दिवशीचा टप्पा, ताज्या दमात पार करून कोंढापुरी या ठिकाणी मुक्कामी असे. त्यासाठी इसवी सन १८१८ साली शासकीय विश्रामगृहाची भव्य-दिव्य, सर्व सुखसोयीयुक्त, इंग्लिश शैलीची इमारत या गोष्टींची साक्ष देत गेली काही वर्षापर्यंत उभी होती. इंग्रज अंमलापासून ते मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तोपर्यंत येथील शासकीय विश्रामगृहाचा कायम निवासासाठी व प्रशासकीय बैठकांसाठी उपयोग होत होता.
हम रस्त्यावर असलेले गाव, अधिकारी, पदाधिकारी यांच्या वस्तीचे गाव असले तरी निसर्गाची कायम अवकृपा असल्यामुळे गावाच्या सोबतीला कायम दुष्काळ होता. अनिश्चित पावसाचे प्रमाण आणि निसर्गावर अवलंबून असणारे जीवनमान यामुळे दुष्काळी परिस्थिती नित्याचीच. भौगोलिक दुष्काळी तालुका म्हणून शिरुरतालुका परिचित होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यान लोकशाही स्थापन झाली आणि थोड्याफार प्रमाणात बदल दिसू लागले सहकारी संस्थांचे जाळे हळूहळू वाढायला लागले आणि शेतकरी जाणता होऊ लागला.
सरदार कोंडाजीराव गायकवाडांनी जी भौगोलिक परिस्थि पाहून कोंडापुरी वसवली होती त्याचा फायदा आता होऊ लागला आधि कामिनी ओढा व त्याच्या शेजारील ओढा यांचा उपयोग करून थोड्याफार प्रमाणात बागायती शेती होऊ लागली. खऱ्या अर्थाने या, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून स्वतंत्र्य भारत सरकारने नोकरशाहीने १९६९ ते १९७२ या काळात कोंढापुरी गावाच्या पश्चिमेला कामिनी ओढ्याचा उपयोग करुन जलसंधारणासाठी गोठा तलाव बांधला आणि याच कालावधीच्या दरम्यान पूर्वेकडे छोटासा पाझर तलावही बांधला अशा प्रकारे गावच्या उशा पायथ्याला मुबलक साठा उपलब्ध झाला. आणि पीड
या दोन्ही तलावामुळे गावच्या आजूबाजूच्या परीसरातील पाण्याची पातळी वाढली. शेतीमध्ये आधुनिकीकर ची व यांत्रिकीकरणाची सुरुवात झाली. पारंपारिक पद्धतीच्या शेतीमध्ये बदल घडू लागले. बैलांच्या खांद्यावरील मोटा जाऊन किर्लोस्कर इंजिनांचा आवाज गाव शिवारात घुमू लागला. शिवारातील काळी आई हे पाणी पिऊन तृप्त होऊन आपल्या शेतकरी लेकरांना भरभरून आशीर्वाद देऊ लागली. अठरा विश्व दारिद्र्यात पिचलेला शेतकरी सुखी होऊ लागला. पंचक्रोशी नव्हे तालुक्यातील बऱ्याच गावांना पाणीपुरवठा करणारे कोंढापुरी हे गाव एक वरदान ठरले.
विजेवर चालणाऱ्या विद्युत मोटारी विहिरींवर बसू लागल्या. सरकारतर्फे, सहकारी संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजना येऊ लागल्या. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दूध संकलन केंद्रे यांच्यासारख्या संस्था गावात आल्या. शेतीबरोबरच कुक्कुटपालन, गाई गोठा यांच्यासारखा जोडधंदा करून शेतकरी स्वयंपूर्ण होऊ लागला. तलावावरून पाण्याच्या पाईपलाईन होऊ लागल्या आणि शिवार हिरवेगार झाले.
पुणे-नगर हमरस्त्यावरून जाता येता कोंढापुरीची ओळख दाखवणारे डोंगर माथ्यावरील ग्रामदैवत खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराची एक जुनी आख्यायिका पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. यानुसार कोंढापुरी शेजारील रांजणगाव गणपती येथील लांडे परिवारातील एक भक्त श्री खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर दर पौर्णिमेला जात असे. ही व्यक्ती वार्धक्याकडे झुकल्यानंतर येणे जाणे अवघड होऊ लागले. त्याच्या मनातील ही खंत आणि पीडा अंतर्मनाने श्री खंडोबा देवानेच जाणली.
या भक्ताच्या आजपर्यंतच्या भक्तीमुळे संतुष्ट झालेले श्री खंडेराव प्रसन्न झाले आणि त्यांनी या भक्ताला मीच तुझ्या घरी वास्तव्याला येतो असे वरदान देऊन परतीच्या प्रवासात मी तुझ्याबरोबर येतो परंतु ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी नाहीसा होईल असे वचन दिले. कोंढापुरी मार्गे हा परतीचा प्रवास करत गावाच्या जवळ आल्यानंतर भक्ताच्या मनातील उत्सुकता दाटून आली आणि नकळतपणे त्याने मागे पाहिले आणि साक्षात श्री खंडोबा भक्ताला या ठिकाणी दिसले. परंतु दैववाणीनुसार देव त्याच ठिकाणी अदृश्य झाले. हीच ती श्री खंडोबा मंदिराची कोंढापुरी येथील पवित्र भूमी झाली. आजही रांजणगाव स्थित लांडे परिवारातील प्रत्येक सदस्य कोंढापुरीतील ग्रामदैवत खंडोबा मंदिरामध्ये दर्शनाला येतोच व आपले देवकार्य याच ठिकाणी करतो.
रुढी परंपरेनुसार नवीन लग्न झालेले जोडपे, लग्नाच्या दुसऱ्या वशी आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र जेजुरीला खंडोबा दर्शनासाठी जातात. परंतु कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबातील विवाहित जोडपे जेजीला देवदर्शनाला जात नाही. जेजुरीचा श्री खंडोबा देव आपल्या गावामध्ये जेजुरीहन आला आहे म्हणून कोणीही जेजुरीला जायचे नाही अशी प्रथा आहे. त्याचबरोबर कोंढापुरीतील कुठलाही गायकवाड कुटुंबातील सदस्य स्वखर्चाने श्री खंडोबा दर्शनाला जेजुरीला आजही जात नाही.
कोढापुरी ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने उत्साहात या आपल्या ग्रामदैवताची दरवर्षी चैत्र पौर्णिमेला यात्रा भरवतात. पूर्ण गावामध्ये केलेली लाईटच्या माळांचे आरास आणि मंदिरावर व डोंगर माथ्यावर केलेली विद्युत रोषणाई विशेष पाहण्यासारखी असते. गावचे ग्रामदैवत खंडेराया बरोबरच गावच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असणारे हनुमान मंदिर त्याच्या शेजारचे भैरवनाथ मंदिर व महादेव मंदिर. अतिशय पुरातन सुरेख व प्रचंड पाषाणातून निर्माण केलेली प्राचीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही दगडी मंदिरे
असे हे छत्रपती शिवरायांच्या काळातील वारसा सांगणारे, त्यांच्या नात्यागोत्यातील गायकवाड सरकार घराण्याचे गाव, ग्रामदैवत श्री खंडेरायाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले कोंढापुरी गाव….
कोरेगाव भिमा जवळ सन १८१८ च्या पेशवे व ब्रिटीश यांच्या झालेल्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या ४९ सैनिकांचीनावे कोरली. यामध्ये २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे -‘One of the Triumphs of the British Army of the Earth’. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 रोजी पहिल्यांदा विजयस्तंभाला स्वतः उपस्थित राहून अभिवादन केले होते.
माळवा प्रांताच्या राज्यकर्त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा काळ हा कला आणि संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या कारकिर्दीत स्थापत्यकलेने विशेष योगदान दिले आहे. अहिल्याबाई यांनी अनेक धार्मिक स्थळांचे निर्माण केले. या स्थळांमध्ये मंदिरं, घाट आणि धर्मशाळा यांचा समावेश आहे, कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या काठावरती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले अहिल्येश्वराचे प्राचीन शिवालय गावाचे सौंदर्य आणखी खुलवत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे काही काळ कोरेगाव भीमा गावात वास्तव्यही होते व त्यांचा भव्यदिव्य वाडाही उभारण्यात आला. आता या वाड्याची पडझड झाली आहे.
कोरेगाव भीमा गावात प्राचीन कोरेश्वराचे शिवालय असून, याच कोरेश्वर शिवालयामुळे गावाला कोरेगाव हे नाव पडले असे मानले जाते.
स्वातंत्र्य संग्रामात कोरेगाव भिमातील भांडवलकर कुटूंबीयांचे फार मोठे योगदान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीनी भारतभर उभारलेला १९४२ च्या चलेजाव चळवळीत मोठ्या नेटाने सहभागी असणारे व स्वतः येरवडा कारागृहात जेल भोगलेले थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त स्व. श्री. मारूती भिमाजी भांडवलकर येवढ्या मोठ्या चळवळीत आपल्या गावातील एक तरूण देशभक्तीच्या ओढीने स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन प्रसंगी कारावास भोगुन देशासाठी बलिदानाची आहुती देतो. ही कोरेगाव भिमाची माती निश्चितच पवित्र असेल. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिराजी गांधी यांनी स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त १५ ऑगस्ट १९७२ रोजी त्यांचा भारत सरकारच्या वतीने ताम्रपत्र देऊन गौरव केला होता
शहराची परंपरा, महानता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवा
नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.